बिनभिंतीची_शाळा

बिनभिंतीची_शाळा

बोर्डाचा पेपर तपासावा तसाचं..
धर्माचा बारकोड लाऊन
माणूस तपासला जातो..

समोरून मिठीत घेऊन
पाठीत खंजर खुपसला जातो...


शिक्षण हे वाघिणीचं दूध..
माणसाला माणूस बनवणारं अमृत..
पण माणसाला पुन्हा जनावर
बनवण्यासाठी आता शाळेत शाळा भरवली जाते..
खोट्या इतिहासाच्या काळ्या फळ्यावर,
कट्टरतेच्या रंगीत खडूने फक्त जात गिरवली जाते..

इथे धर्माचा घंटा वाजला,
कि विषमतेचा तास भरतो..
लोकशाहीचा मोकळा श्वास,
हळू हळू सविंधानाच्या गळ्याचा फास बनतो..

चरित्रहीन चरित्र आणि शिक्षण नसलेला शिक्षक
पवित्र माणसाचं चरित्रहणन करून 
चरित्र शिकवण्यासाठी उभा राहतो वर्गात...
आणि असंख्य अनैतिक बिजं रुजवतो
मेंदू असलेल्या
पण मेंदू गहाण ठेऊन वर्गात बसलेल्या
वर्तमानाच्या गर्भात...

शाळेतील शाळेची चाचपणी करण्यासाठी
रोजच छोटी मोठी चाचणी घ्यावी लागते..
पण वर्षातून एखादी कोरेगाव भीमा सारखी
मोठी परीक्षा हि घ्यावी लागते...

ह्या शाळेत सरावच इतका होतो कि 
रोजच्या चाचणी मध्ये जात
आणि माणूस मारला कि 
बोर्डाच्या परीक्षेत धर्मच नंबर मारतो...
विचारांचा एक्सामीनर फक्त खुर्चीत बसून राहतो..
आणि मानवतेच्या परीक्षेत माणूस फेल होतो..

म्हणून ह्या शाळा करणाऱ्या
शाळेतल्या शाळेच्या शाळेमुळं
काळानी धडा शिकवण्याआधी 
आपल्याला यांची शाळा कळली पाहिजे...
शिक्षण हे वाघिणीचं दुधचं आहे
फक्त आपण खरी समतेची शाळा शिकली पाहिजे...

फक्त आपण खरी समतेची शाळा शिकली पाहिजे....
95 03 06 05 48

Post a Comment

0 Comments