चिञमंथन

चिञमंथन

भांबावला आहेस ? हातात रंगपेटी, कुंचला आणि पेन्सिल घेऊन? आधी पेंसिलने चित्र काढू कि सरळ रंगच भरु? नाहीतर फेकूनच देऊ का सारे, या विचारात? थांब ना जरासा. लाल आणि पांढरा एवढेच रंग भरतोस रे तू म्हणूनच तुझे मागचे चित्र फसलेलं ना. कोणतंही चित्र काढण्याआधी, रंग कालवण्याआधी थोडेसं भटक ना.

त्या चित्रकारांच्या प्रसिद्ध बेटावर- जिथे कोणाची फसलेली तर कोणाची साधलेली चित्रे त्यांच्या असण्यात शोषलेली आहेत. त्यांच्या त्या सगळ्याच अस्तित्वाचा रंग टिपून घे ना जरा तुझ्यात. साद घालणाऱ्या त्या कोपऱ्यावरच्या अंधाऱ्या बोळीतही फिरून ये ना. दे झोकून स्वतःला तिथल्या वासनेच्या काळ्या गटारात आणि फास काळे तुझ्या मनाच्या पांढरेपणाला. अध्येमध्ये टाकत जा चक्कर त्याही कट्ट्यावर जिथे तुझी प्रेयसी तासंतास गप्पा मारत असते तिच्या प्रियकराशी. त्याच्या बाहुपाशात अडकताना तिच्या डोळ्यात उमटणारा प्रीतीचा रंग कोरून घे तुझ्या मनाच्या पटलावर. चर्रर्र आवाज करेल तुझे मन पण जात रहा अमावस्या - पौर्णिमेला. दरवेळी एकच मरण मरशील पण प्रत्येक मरणाची छटा मात्र वेगळी असेल. घे गिळून तो कडवा घोट दरचवेळी. हा, पण थांबू नकोस फार काळ तिथेच. फिरत राहा, मुसाफिर बन.
अमृता म्हणून ही जगलास ना आणि इमरोझ ही, मग घे ना आता साहिर पांघरून. लाव मुद्दामच वेड कोणाला तुझ्या ओढलेल्या थोटकांचे. त्या सिगारेटच्या धुरात चूर झालेल्या एखाद्या अमृताचा रंग चोर साहिर बनून. कधी रडणाऱ्या सखीला कुशीत घेण्याचा रंग चाख तर कधी तुझ्या डोळ्यातून वाहणारा रंग तिच्या कुशीत टाकून पहा त्या रंगाचाही रंग. वैराग्याच्या भस्मात मिसळ ना थोडीशी मायेची कावीळ आणि फास ना ती पिवळाई तुझ्या संवेदनेला. फिरत राहा जाणिवांची पेटी घेऊन. बेईमानी कर, नादानी कर, टाक झटकून तुझ्यातला तुझा रंग. डोंगर चढ, दरी उतर . तिथली तपकिरी प्राशुन घे मनमुक्तपणे. मुद्दामच वाटेवरची झोपडी गाठ, घे त्या झोपडीमध्ये मिणमिणणारी हिरवाई अलगद तुझ्या पेटित उतरून. झोपडीला भेट दिलीस ना मग एखाद्या चंदेरी महालावरूनही हात फिरवून ये. तिथे मिसळलेले सगळेच रंग तुझ्या पेटित सामावतीलच असे नाही. जेवढे हाताला लागेल बस तेवढेच घेऊन ये. थोडासा आपल्या लोकांतही भटक ना. कर्तव्याच्या आड लपलेल्या परकेपणाचा रंग कुंचल्याने फासून घे ना तुझ्याही चेहऱ्याला. परके चेहरेही ओरबाडून पहा, कुबेराचा खजिना मिळावा तसा आपलेपणाचा रंग ओघळणारा चेहरा ही सापडेल तुला कदाचित. डल्लाच मार आणि लुटून घे तो रंग साराच सारा.
बस इतकेच कर ना, खूप झाले चित्र आणि चित्रकार, तू तेवढा 'कॅनव्हास' बन ना

लेखक ...सुमित गुणवंत...Post a Comment

0 Comments