पहिल्या प्रेमाची दुसरी बाजू

पहिल्या प्रेमाची दुसरी बाजू

एफ सी रोडवरून
हातात हात घालून फिरताना,
सदाशिव पेठेचा थेट संबंध
गावातील जात वाड्याशी येतो
हे कधी जाणवलचं नाही...
आणि विद्यापीठाच्या समानतेचं वातावरण
गावातल्या वेशीबाहेरच्या मातीला 
कधी मानवलचं नाही....


डेक्कनचा वाफाळलेला 
अमृत तुल्य गरमा-गरम चहा,
दोघात एक...."समान"...
करून पिला तरी,,
तिच्या घरी,
गोठ्याबाहेरच्या देवळीत
दांडा तूटलेला कप अन चिरलेली बशी 
अजून तशीचं आहे..
हे तिला माहीतचं नव्हतं,
नाहीतर डेक्कनच्या अमृततुल्य चहाचं 
कधीच विष झालं असतं..


टिळक रोड ला 
एकाच प्लेट मधी पाणी पुरी खाताना,
तिखट लागून ठसका लागला, 
आणि तिच्या डोळयात खळकण पाणी आलं..
तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून
माझंच पाणी पाणी झालं..
पण गावामधी तिच्या माझ्या
पिण्याच्या पाण्याचा पाणवठा
वेगवेगळाचं आहे हे कधी आठवल नाही...

पाणवठया सारखा म्हसनवठा सुद्धा वेगळाच,
म्हणून तर ताजमहालाचं साधं चित्र असणारं 
गिफ्ट सुद्धा मी तिला कधी पाठवल नाही...


सिटीतल्या चकाचक रस्त्यावरून चालताना 
मी मधीच घसरायचो जातीच्या गटारात
ती म्हणायची सोड रे सगळं जून झालय
माझ्या शब्दापुढं कोणीचं नाही
सगळे मला खूप जीव लावतात...

माझ्याच कवितेतल्या जातीअंताच्या 
दोन ओळी ऐकवत बोलायची चल थोडं फिरून येऊ
पुण्यातले गणपती नवसाला पावतात...

गणपती टाळण्यासाठी 
आणि माझा विचार जिवंत ठेवण्यासाठी
तिचा तेवढ्यापूरता निरोप घेऊन
मी गालातल्या गालात हसायचो...
आणि जातीअंताची लढाई लढणारा मी 
मीच मला किती जातीवादी दिसायचो..

मी बोलायचो,इतिहास सांगायचो..
आणि सांगायचो हा देश 
कसा व्यवस्थेच्या गुलामीत फसलाय...
ती हसून मला येड्यात काढून म्हणायची
बघ मी तुझ्या सोबत आहे ना 
तुला कुठं माझ्यात जातीवाद दिसलाय....


असंच अचानक तिला घरून बोलावनं आलं 
तिला आतल्या खोलीत नेऊन 
आतलं काही सांगितलं 
कि......,

तिच्या मनाच्या खोलीत खोलवर 
आतलं काही माघीतलं...मला माहित नाही...
पण तीच शेवटचं एकच वाक्य होतं
आता शक्य नाही अरे लोकं काय म्हणतील....?


शनिवार वाड्याच्या पायरीवर,
आम्ही तासन-तास गप्पा मारायचो..
गाव गाड्याच्या किस्यांवर खदखदून हसायचो...

असंवेदनशील समाजाच्या वातावरणात
कट्टरतेचा ढोल बडवत 
लोकं दंगली घडवत असताना,
आम्ही आमचं प्रेम घडवलं होतं...
"अंतर जातीय विवाह मान्यचं नाही"
म्हणूनचं तर......

तीन तिचं माझं अंतर वाढवलं होतं...
आता एकच खंत वाटते 
कि.....

गावगाड्यावर बोलण्यापेक्षा
बोलायला पाहिजे होत जातवाड्यावर...!!
आणि शनिवारवाड्याच्या पायरीपेक्षा
बसायला पाहिजे होतं फुले वाड्याच्या पायरीवर ....!!

Post a Comment

0 Comments