विद्रोह

विद्रोह

साखळीला बांधलेल्या कुत्र्याचं लोकांवर भुंकण,

टाळ्या वाजवणाऱ्या जमातीचं जिंदगीवर थुंकणं,
म्हणजे विद्रोह असतो का.....?


रस्ता चाचपडणाऱ्या बेवड्याच्या शिव्या,
सत्तेची कुलुपं उघडणाऱ्या राजकीय चाव्या,
म्हणजे विद्रोह असतो का.....?

आई बहिणीच्या अवयवांच्या नावाचा उद्धार,
मंच पाहून बदलणारा लेखणीचा गद्दार,
म्हणजे विद्रोह असतो का.....?

मनोरंजनासाठी लेखनात केलेला माकड चाळा,
यमकासाठी मारलेला मुख्य आशयाचा गाळा,
म्हणजे विद्रोह असतो का.....?

दिशाहीन मोक्कार सुसाट बेभान सुटलेला वारा,
महापुरुषांच्या नावाचा नुसताच बेधडक मारा,
म्हणजे विद्रोह असतो का...?

विद्रोह भडकलेला माथा नसतो
विद्रोह असतो तुकारामांची गाथा...
माणसाला माणूसपण शिकवण्या
माणसांनी माणूस व्हावं स्वतः...

विद्रोह आग नसतो 
विद्रोह असतो समतेचं पाणी..
जाती धर्मांनं पेटलेल्या 
माणसांना विझवणारी गाणी..

विद्रोह राग नसतो 
विद्रोह असतो बुद्धाच्या करुणेची बाग...
अरे माणसा तू माणसाशी माणसासारखं वाग..

विद्रोह जन्मासाठी लढलेलेला गर्भ असतो..
वर वर खळखळ उथळ नाही 
खोल सागरी विचारांचा संदर्भ असतो..

विद्रोह व्येवस्थेशी बंड असतो
मानवतेसाठी थंड असतो
राजकीय गुंडांचा गुंड असतो
विद्रोह करणाऱ्यां माझ्या बंधुंनो
लक्षात ठेवा विद्रोह कधीच षंढ नसतो....
विद्रोह कधीच षंढ नसतो...।।

९५०३०६०५४८

Post a Comment

0 Comments